हरिद्वार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी हरिद्वार इथे बोलताना पुन्हा एकदा अखंड भारताविषयी भाष्य केले आहे. सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. पुढील २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होणार आहे, मात्र आपण सगळ्यांनी मिळून आणखी थोडा प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच तयार होईल. हा भारत तयार करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही आणि जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे बुधवारी हरिद्वार येथे ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आणि श्री गुरुत्रय मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. यावेळी ते म्हणाले की, अखंड भारताविषयी आम्ही अहिंसेच्याच मार्गाने पुढे जाणार आहोत, फक्त त्यावेळी आमच्या हातात काठी असेल. आमच्या मनात कोणाविषयीही द्वेष नाही, शत्रुत्त्वाची भावना नाही, पण या जगाला शक्तीचीच भाषा कळते तर आम्ही तरी काय करणार? असा सवाल भागवत यांनी उपस्थित केला आहे.