काबूल : वृत्तसंस्था : अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांशी चर्चा करण्यासाठी चीनचे शिष्टमंडळ मंत्रालयात येण्यापूवीर्च बुधवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात पाच जणांना मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले. हल्ला करणारा व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता.
या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नसून त्यामागे इस्लामिक स्टेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी आयएसने काबुलमधील एका मशिदीवरही हल्ला केला होता. यात चार जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले होते. काबूलमधील चिनी व्यावसायिकाच्या हॉटेलवरही गोळीबार झाला होता.