कठुआ : ‘बम-बम भोले’च्या घोषणांनी दोन वर्षांनंतर आज वार्षिक अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. कोरोनाकाळात ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. समुद्रसपाटीपासून ३, ८८८ मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी भाविकांनी सुरुवात केली आहे.
दरम्यान, सुरक्षेसाठी प्रशासनाने सीआरपीएफचे दोन लाख जवान तैनात केले आहेत. कठुआ जिल्ह्यातील लखनपूर येथे इतर राज्यातून येणा-या वाहनांच्या कडक तपासणीसोबत शहरातील इतर अनेक भागातून येणाच्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे.
यात्रेच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.