मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
भुलाभाई देसाई मार्गावरील ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानात शुक्रवारी (दि. ८) दुपारी घुसलेल्या १०९ आंदोलनकर्त्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण ११० जणांना अटक केली होती. त्यांच्यात २३ महिलांसह ‘सिल्व्हर ओक’ परिसराची टेहळणी करणा-या चौघांचा समावेश आहे.
या प्रकरणी सदावर्ते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.