पुणे : शिवसेनेचे शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव पाटील यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील यांच्या राजकीय नाट्यावर आता पडदा पडला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु दोन तासांतच नजरचुकीने बातमी छापली सांगत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेत त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर आढळरावांनी मातोश्रीवर जाऊन आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले होते. मात्र, आज शिंदे गटाच्या बैठकीला आढळराव उपस्थित राहिल्याने आज शिवसेना सोडल्याचे स्पष्ट झाले. त्यातच शिंदे गटाने आढळराव यांची नव्या कार्यकारिणीत उपनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे ते शिंदे गटात सामिल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज बैठक बोलावली
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उद्या मंगळवार दि. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिवनेरी निवास, लांडेवाडी, तालुका आंबेगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि जुन्नर विधानसभेचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापुरातही मोठा झटका
शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने हे दोघेही शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगोदरच आ. आबिटकर, राजेश क्षीरसागर, येड्रावकर शिंदे गटात दाखल झालेले आहेत. त्यातच आता दोन्ही खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेला फार मोठा हादरा बसणार आहे.
अकोल्यातही फूट
अकोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनी आपल्या आमदार मुलासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे समजते. पित्यासह पुत्र आणि विधान परिषद आमदार विप्लव बाजोरियाही शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. तसेच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, महापालिका नगरसेवक आश्विन नवले, शशी चोपडेही शिंदे गटात गेले आहेत. आता उद्या बाजोरिया आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत.