24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआणखी २ दिवस उष्णतेची लाट

आणखी २ दिवस उष्णतेची लाट

एकमत ऑनलाईन

पाच दिवसांत पावसाची शक्यता, मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर
मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची लाट आली असून त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच हवामान खात्याने मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या ५ दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मान्सून कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील कारवार भागात खोळंबला आहे. दरम्यान, पुढील २ दिवस मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची चिन्हे आहेत.

राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याने मान्सून कर्नाटकमधील कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. नैऋत्य मोसमी वा-याच्या महाराष्ट्र प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सून कर्नाटकातच थबकल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील ५ दिवसांत राज्यातील अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतर अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

केरळमध्ये मान्सूनने २९ मे रोजी प्रवेश केला आहे. त्यानंतर ३१ मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत येऊन ठेपला आहे. गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये पोहोचेल, असे भाकीत हवामान विभागाने केले होते. पण हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वा-याच्या महाराष्ट्रात प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच थांबला आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने लगतच्या बहुतांश भागांत मान्सूनने प्रवेश केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या