मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी संध्याकाळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडत असल्याचे जाहीर करून यापुढे फक्त शिवसेनेची धुरा सांभाळणार असल्याचे सांगितले.
गेल्या अडीच वर्षात सरकारने जनहिताचे बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. शिवसेनेने सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे केले, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केले. यामुळे आयुष्य सार्थक लागले, असे म्हटले.
एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचे आहे. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचे जरा दु:ख होत आहे. जे लोक दगा देणार असे सांगितले गेले, त्यांनी साथ दिली. आपली नाराजी होती तर सुरतमध्ये किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन सांगायला हवे होते, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखविली.
ज्यांना सर्व काही दिले ते नाराज झाले
साधी माणसे, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले… या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी माणसात आणले, आमदार, खासदार बनवले, मंत्री बनवले. पण हे लोक मोठी झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिले ते नाराज झाले…पण ज्यांना काहीच दिले नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत, ठाकरे म्हणाले.
राज्यपालांना टोला
उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. लोकशाहीचे पालन झालेच पाहिजे, मी राज्यपालांचे आभार मानतो, केवळ एका पत्रानंतर लगेच त्यांनी हालचाल केली आणि बहुमत सिद्ध करायला सांगितले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये
उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावे. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे. ते पाप माझे आहे, त्यांच्यावर विश्वास मी ठेवला, असेही ठाकरे म्हणाले.