26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रआमच्या रक्तामध्ये बेइमानी नाही

आमच्या रक्तामध्ये बेइमानी नाही

एकमत ऑनलाईन

पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारांवरून राज्यात मोठा राजकीय वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सातत्याने अजित पवारांना यावरून लक्ष्य केले जात आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे देखील आरोप करण्यात आले. यावरून आता अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून विरोधकांना थेट इशारा दिला आहे. ‘राज्यात फक्त जरंडेश्वर कारखान्याचाच व्यवहार झालेला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगेन’, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांनाच लक्ष्य केले. तसेच, उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. ‘‘जरंडेश्वर साखर कारखाना ही केस ईडीकडे आहे. कोर्टात प्रकरण आहे. भाजपाचे सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली.

इओडब्ल्यूचीही चौकशी झाली. सहकार विभागाने निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत देखील चौकशी झाली. राज्यात फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. त्याची सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे. त्याची सगळी कागदपत्रं देखील माझ्याकडे आहेत. उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेईन. राज्यात सुरुवातीपासून किती कारखाने, कुणाच्या कारकीर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन. काही कारखाने ३ कोटी, ४ कोटी, १२-१५ कोटी अशा किमतीला विकले गेलेत’’, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी आपण कोणतीही बेइमानी केलेली नसल्याचे प्रतिपादन केले आहे. ‘‘बरेच कारखाने चालवायला देखील दिले जात आहेत. आजही राज्यात १२-१३ कारखाने चालवायला देण्याचे टेंडर निघाले आहे. २०-२५ वर्षे चालवायला दिले जातात अशी वस्तुस्थिती आहे. पण काहीजण जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतात.

मी कधीही खोटं बोलणार नाही
आम्ही प्रत्येक वेळी माध्यमांसमोर जात नाही. मी कमीत कमी माध्यमांसमोर जाणारा आणि वस्तुस्थितीला धरून चालणारा माणूस आहे. माझ्याविरुद्ध काही लोकांनी गरळ ओकण्याचं देखील काम केलं की मी बेइमानी केली. मी ९० सालापासून राजकारणात काम करतोय. उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेइमान आहे की शब्दाचा पक्का आहे. मी कधीही खोटं बोलणार नाही जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे. माझ्या आयुष्यात मी कधी बेइमानी केली नाही. आमच्या रक्तामध्ये बेइमानी नाही’’, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न
‘‘आजच प्रेस घेणार होतो, पण आज मला कामं आहेत. उद्या प्रेस घेऊन सांगणार आहे. त्यात दाखल्यासहित सगळं सांगेन. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने घेतले आहेत. पण त्यांच्याबद्दल बोललं जात नाही, पण माझ्या नातेवाईकांबद्दल बोललं जातं’’, असे देखील ते म्हणाले.

विमा कंपन्यांना इशारा!
‘‘शेतक-यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतक-यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही.’’ असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.
‘‘विमा कंपन्यांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने करावे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतक-यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी.’’असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
‘ज्या नुकसानीमुळे बळिराजाला, कष्टक-याला पीक विमा मिळू शकतो, तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे.’असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या