मुंबई : अमेरिकेसहित अनेक बड्या देशांनी त्यांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आरबीआय आपला व्याजदर वाढवणार का याचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक बुधवारपासून सुरू झाली असून शुक्रवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्याबाबतचा निर्णय होणार आहे.
शुक्रवारी जाहीर होणारे पतधोरण हे या आर्थिक वर्षातील पहिलेच पतधोरण असेल. अर्थतज्ज्ञांच्या मते, आरबीआय या वेळीही आपल्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ करण्याची शक्यता नाही.
सध्याचा महागाई दर पाहता आरबीआयकडून इन्फ्लेशनच्या आपल्या अंदाजात वाढ करण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेल, इंधन, भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बँकेने सलग १० वेळा व्याज दरात कोणताही बदल केला नाही. सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम आहे तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ इतका आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जीडीपी ७.८ टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला होता.