19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रआश्वासनपूर्ती न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

आश्वासनपूर्ती न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

एकमत ऑनलाईन

अंगणवाडी सेविकांचा मुंबईत इशारा, आझाद मैदानावर निदर्शने
मुंबई : अनेकदा प्रयत्न करूनही मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून हजारो अंगणवाडी कर्मचा-यांनी मुंबईत धडक देत आझाद मैदानावर निदर्शने केली. यावेळी राज्याचे महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेदरम्यान, लोढा यांनी मानधनवाढीसह सर्वच प्रश्नांवर राज्य सरकार निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, अंगणवाडी सेविका कृती समितीने यासाठी महिन्याची मुदत दिली असून, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, अंगणवाडीचे भाडे, आहार व इंधन भत्ता, प्रवास भत्ता, सेवा समाप्ती लाभ आदी कर्मचा-यांच्या थकीत रकमा देणे, खाजगीकरण रोखणे, ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिष्टमंडळाला आमंत्रित केले व सविस्तर चर्चा केली.

या शिष्टमंडळात एम. ए. पाटील, शुभा शमीम, भगवानराव देशमुख, निशा शिवुरकर, माधुरी क्षीरसागर, जीवन सुरुडे, सरिता कंदले यांचा समावेश होता. मंत्री लोढा यांनी अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. आझाद मैदानावर स्वत: येऊन मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून लवकरच ती जाहीर करेल, अशी ग्वाहीदेखील मंत्री लोढा यांनी दिली. हे आंदोलन एम. ए. पाटील, शुभा शमीम, कमल परुळेकर, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

दरम्यान, कृती समितीने या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याकरिता शासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत मानधन वाढीचा आदेश न निघाल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढण्याचा व अधिवेशनात सर्व प्रश्नांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारला संपाची नोटीस देऊन संपावर जाण्याची तयारी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या