गुवाहाटी : आसाममध्ये सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या आठ झाली आहे, तर राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये ४ लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. अधिका-यांनी सांगितले की, सुमारे ४० हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. दिमा हासाओ हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या इतर भागापासून तुटला आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिका-यांनी सांगितले की, दक्षिण आसामच्या कछार जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दिमा हसाओ आणि लखीमपूर जिल्ह्यात भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार कचर जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे सहा जण बेपत्ता आहेत.
२४ जिल्ह्यांतील ८११ गावांमध्ये किमान २,०२,३८५ लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे ६,५४० घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने २७ मदत वितरण केंद्रे उघडली असतानाही ३३,३०० हून अधिक लोकांनी ७२ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कचार, दिमा हसाओ, होजाई, चराईदेव, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, बजाली, बक्सा, बिस्वनाथ आणि लखीमपूर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.