बटलरसह तिघांचे शतक, विक्रमांचा पाऊस
लंडन : जोस बटलर, फिल सॉल्ट आणि डेव्हिड मलान या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँडस्च्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करीत ३ शतके ठोकून वनडेतील सर्वोच्च धावसंख्या केली.
दुस-या षटकात जेसन रॉयला बाद केल्याने नेदरलँडच्या गोलंदाजांनी जल्लोष केला. परंतु फिल सॉल्ट आणि डेव्हिड मलान यांनी तब्बल २२२ धावांची भागीदारी करून गोलंदाजांची नशाच उतरविली. त्यानंतर जोस बटलरनेही शतक ठोकले. त्याने अवघ्या ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. एका वनडे सामन्यात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे. बटलर लिएम लिव्हिंगस्टोनने तुफान फटकेबाजी करताना ३५० ते ४५० हा टप्पा अवघ्या २६ चेंडूत गाठला आणि इंग्लंडने वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला.
सॉल्टने ८२ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे पहिले शतक आहे. बटलरने ४७ चेंडूत ६ चौकार, ८ षटकारांसह १०१ धावा केल्या. इंग्लंडकडून हे दुसरे सर्वांत वेगवान शतक ठरले. या आधी बटलरनेच पाकिस्तानविरुद्ध ४६ चेंडूत शतक ठोकले होते.