21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडाइंग्लंड सुस्थितीत, विजयाची संधी

इंग्लंड सुस्थितीत, विजयाची संधी

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहॅम : चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकानंतरही भारतास इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या क्रिकेट कसोटीत दुस-या डावात २४५ धावांची मजल मारता आली. इंग्लंडने ३७८ धावांचा पाठलाग करताना सोमवारी दमदार सुरुवात केली. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रंगतदार ठरणार आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद २५९ अशी मजल मारली असून त्यांना विजयासाठी ११९ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना ७ विकेट्स मिळवाव्या लागणार आहेत. भारताच्या मार्गात जो रुट (खेळत आहे ७६) आणि जॉनी बेअरस्टो (खेळत आहे ७२) हे दोन मोठे अडथळे असणार आहेत. कारण चौथ्या दिवशी त्यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे आता पाचव्या दिवशी नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

भारताची आघाडी ४०० धावांच्या आत रोखली असली तरी लक्ष्य सोपे नाही याची इंग्लंडला जाणीव होती. इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या डावात त्यांनी चारपेक्षा जास्त गतीने धावा केल्या होत्या. दुस-या डावातही त्यांचा पवित्रा आक्रमकच होता. भारतीय गोलंदाजांना स्थिरावू देण्याची त्यांची योजना ब-यापैकी यशस्वी झाली. अ‍ॅलेक्स लीस (५६) आणि झॅक क्रॉली (४६) यांनी शतकी सलामी दिल्यानंतर भारताने दोन धावांत तीन फलंदाज बाद केले. मात्र पहिल्या डावातील शतकवीर जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांनी भारतास केवळ विकेट घेण्यापासूनच रोखले नाही, तर वेगाने धावाही केल्या. चेंडू वळत असतानाही त्यांनी रवींद्र जडेजाला विकेटपासून रोखत भारतावरील दडपण वाढवले.

भारताचा दुसरा डाव उपाहारानंतरच्या नवव्या षटकांत आटोपला. पहिल्या डावात भारताच्या अखेरच्या पाच विकेटनी इंग्लंडला सतावले होते, पण दुस-या डावात ५ बाद १९८ वरून भारताचा डाव २४५ धावात आटोपला. त्यामुळे इंग्लंडला चारशेपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देण्यात भारतास अपयश आले.

सकाळच्या सत्रात पुजारा आणि पंत या तिस-या दिवसाच्या नाबाद जोडीने आश्वासक सुरुवात केली होती. पुजाराने अँडरसनला सलग दोन चौकार मारले होते. पहिल्या डावाच्या तुलनेत पंतचा जास्त भर बचावावर होता. हे दोघे मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच ब्रॉडच्या खूपच बाहेरच्या चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नात पुजारा परतला. काही वेळातच श्रेयस अय्यरला आखूड टप्प्याच्या चेंडूने चकवले. अर्धशतक केल्यानंतर पंतने रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात स्लीपमध्ये झेल दिला. भारताच्या तळाच्या फलंदाजांना इंग्लंडच्या आखूड टप्प्याच्या चेंडूच्या मा-यास सामोरे जावे लागले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या