इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची आता धोक्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा एक मोठे वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षाद्वारे संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर अस्थापनेने आपल्याला केवळ राजीनामा, अविश्वास प्रस्तावावर मतदान आणि निवडणूक हे तीनच पर्याय दिल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नंबर गेममध्ये रनआऊट होण्याची शक्यता अधिक आहे. एक तर इम्रान खान यांच्या मित्रपक्षांनी साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. एवढेच नव्हे, तर या सर्व बंडखोरांनी त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे इम्रान सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची खुर्ची जाणे अटळ असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
पाकिस्तानच्या ७३ वर्षांपेक्षा अधिकच्या इतिहासात अर्ध्यापेक्षा जास्त अधिक कालावधीत लष्कराचीच राजवट होती. पाकिस्तानच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत लष्कराचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होता. सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी कथितरित्या या आठवड्यात पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली.
विरोधी पक्ष, सत्तारुढ पक्ष आणि कोणत्या अन्य पक्षाकडून वेळेपूर्वी निवडणुका किंवा राजीनाम्याचा पर्याय दिला होता का, असा सवाल केला. यावेळी त्यांनी आपल्यासमोर तीन पर्याय ठेवल्याचे म्हटले. मी राजीनामा देण्याबाबत विचारही करू शकत नाही आणि जोपर्यंत अविश्वास प्रस्तावाचा प्रश्न आहे. मी अखेरच्या क्षणापर्यंत लढण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आम्ही निवडणुकीला सर्वोत्तम पर्याय म्हटले, असे इम्रान खान यांनी सांगितले.
बंडखोरांसोबत राहू शकत नाही
अविश्वास प्रस्ताव जरी पारित झाला नाही, तरी आम्ही कोणत्याही बंडखोरासोबत सरकार चालवू शकत नाही. नव्यानेच निवडणुका घेण्यात याव्यात, हेच पाकिस्तानसाठी चांगले असेल, असेही इम्रान खान म्हणाले.