बहुमत चाचणीपूर्वी विधिमंडळ सचिवालयाचे पत्र, कोर्टात जाणार : सावंत
मुंबई : शिंदे सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार असल्याने रविवारी रात्री मोठी खेळी खेळण्यात आली आणि थेट विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची मान्यता रद्द करून बंडखोर गटाचे एकनाथ शिंदे हेच गटनेते आणि भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आज दोन मोठे धक्के बसले. व्हीप जारी केल्याने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अडचणी वाढणआर आहेत. दरम्यान, भाजपकडून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात असून, याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे शिवसेना नेते खा. अरविंद सावंत यांनी सांगितले.
विधिमंडळ सचिवालयाने ही मान्यता दिली आहे.कायदेशीर तरतुदीनुसार आणि कायदेशीर बाबींचा विचार करूनच विधिमंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून मान्यता रद्द करण्यात आली. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील. विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नेमले गेले. मात्र, आता विधिमंडळ सचिवालयाने ही नियुक्ती रद्द केली आहे. तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे पत्र विधानमंडळ सचिवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आजच शिवसेनेला आज मोठा धक्का बसला.
शिवसेनेच्याच आमदारांवर
आता कारवाईचा बडगा?
एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले, हेच विधिमंडळाचे गटनेता आणि प्रतोत असतील, असे विधानमंडळाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या कायदेशीर अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी शिवसेना कोर्टात जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण व्हिप न बजावल्याने त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यता आहे.