23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री साहेब, गोलमाल उत्तर देऊ नका

उपमुख्यमंत्री साहेब, गोलमाल उत्तर देऊ नका

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आमदार सुहास कांदे आक्रमक
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाचे पडसाद पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनात उमटले. उपमुख्यमंत्री साहेब, गोलमाल उत्तर देऊ नका म्हणत सुहास कांदे विधान भवनात आक्रमक झाले होते. सुहास कांदे आणि भुजबळ वाद राज्यात सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे. हा वाद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही पोहोचला होता.

त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद काही अंशी मिटवला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशना दरम्यान हा वाद उफाळून आला आहे. यावेळी सुहास कांदे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारत या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याचा तगादा लावला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही.

दरम्यान यावेळी सुहास कांदे यांनी सुरुवातीलाच २०१५ च्या सुमारास झालेल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा लेखाजोखा मांडत लक्षवेधी मांडली. यावेळी ते म्हणाले की, अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी अंधेरी आरटीओ आणि महाराष्ट्र सदन संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. या संदर्भात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. जवळपास हा घोटाळा ११६० कोटी रुपयांचा आहे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण मागे घेण्यात आले आणि त्यात तत्कालीन मंत्री असलेल्या नेत्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यानंतर मंत्रिमहोदयांचे मतदार संघात जोरदार स्वागतही करण्यात आले.

ते पुढे म्हणाले, नंतर विधी विभागाने एक शासन निर्णय काढला की, उच्च न्यायालयात अपील करायचे. मात्र त्याच विधी विभागाने पुन्हा पत्र काढून अपील करण्याची गरज नसल्याचे सांगितले. असे काय झाले की विधी विभागाला आपला निर्णय बदलावा लागला, असा सवाल देखील यावेळी कांदे यांनी उपस्थित केला. विधी व न्याय विभागाने कोणाच्या दबावाखाली हे पत्र काढले? याची चौकशी होणार का? का ते ते माजी मंत्री बाहुबली आहेत, त्यांनी ब्लॅकमेल केले का? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित करत या संदर्भात आपण पुन्हा अपील करणार असल्याचे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात चौकशी केली जाईल : उपमुख्यमंत्री
दरम्यान सुहास कांदे यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे दोन जीआर रद्द करण्याचा निर्णय अधिकारी यांनी घेतला नाही. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात केला आहे. त्यामुळे याची पुन्हा तपासणी करता येते का हे पाहिले जाईल तसेच पुन्हा अपील करता येईल का या संदर्भात चौकशी केली जाईल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुहास कांदे यांना दिले. मात्र या उत्तरावर सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही.

फडणवीसांच्या मदतीला अजित पवार आले धावून
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील अनेक वाद हे सर्वश्रुत आहेत. माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले. यावेळी ते आक्रमक झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. ‘ही फाईल त्यावेळी असणा-या मुख्यमंत्र्यांनी बंद केली आहे. यावर शासन योग्य ती कारवाई करेल. त्या संदर्भातील निर्णय सभागृहात करता येणार नाही. त्या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून निर्णय करता येईल’ असे फडणवीस म्हणाले. मात्र, सुहास कांदेंनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत उत्तर देण्याचा आग्रह केला. यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थी करत पण कांदे मला हे उत्तर असेच पाहिजे म्हणू शकत नाहीत, अशी समज दिली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या