नवी दिल्ली : यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. यूजीसी विद्यार्थ्यांना दोन पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौतिक मोडमध्ये शिकण्याची परवानगी देणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी मंगळवारी याची घोषणा केली.
विद्यार्थी आता एकाच विद्यापीठात किंवा वेगवेगळ््या विद्यापीठांमधून दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. विद्यापीठ अनुदान आयोग लवकरच या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जाहीर केल्यानुसार आणि विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे जगदीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बारावीचा निकाल लागल्यानंतर लवकरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास परवानगी देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येत आहे. ज्यायोगे विद्यार्थ्यांना दोन पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौतिक पद्धतीने करता येतील, असेही जगदीश कुमार यांनी सांगितले.
ऑफलाईन, ऑनलाईन अभ्यासक्रमास परवानगी
विद्यार्थ्यांना ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची परवानगी दिली जाईल. बुधवारी यूजीसीच्या वेबसाइटवर जाहीर केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. मार्गदर्शक तत्त्वे वैधानिक संस्था आणि उच्च शिक्षण संस्था नियंत्रित करू शकतात.
उपस्थितीबाबतचा
निर्णय विद्यापीठ घेईल
उपस्थिती अनिवार्य असेल की नाही याचा निर्णय विद्यापीठे घेतील. यूजीसीने तसे आदेश दिलेले नाहीत, असेही आभासी बैठकीत जगदीश कुमार म्हणाले.