21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रएकाच दगडात मारले अनेक पक्षी !

एकाच दगडात मारले अनेक पक्षी !

एकमत ऑनलाईन

मुंबई : देवेंद्र फडणवीस वारंवार राज्य सरकारवर टीकेचे प्रहार करत सरकारला हादरा देण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनी नेतृत्व करण्याची संधी आल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या हाती सत्तेची सूत्रे कशी सोपवली, याचीच चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. मात्र, भाजपने ही खेळी करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच गेम उलटवून खुद्द ठाकरे आणि शिवसेनेची कोंडी केली आहे. तसेच मागच्या अडीच वर्षांतील अनेक हिशेब चुकते केले आहेत.

भाजपने स्वत:चे १०६ आमदार असताना ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, भाजपने अवलंबलेली ही रणनिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसारखीच असल्याचे बोलले जात आहे. १९९९ ते २०१४ आणि त्यानंतर २०१९ साली राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत सहभागी झाली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले, पण गृहखाते, अर्थ खाते यांच्यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. आता फडणवीस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यावर स्वत: गृहमंत्री होणार का, तसेच अर्थमंत्री भाजपचाच होणार का, याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत.

१) उद्धव ठाकरे यांना शह,
२०१९ चा हिशोब चुकता

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. मात्र शिवसेनेने वेगळा मार्ग निवडला आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच अवघ्या १० दिवसांत घडलेल्या नाट्यमय घडामोडीत शिवसेनेच्या ५५ पैकी तब्बल ३९ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले. त्यांच्यासोबत मुंबई, ठाण्यासह राज्यातील ग्रामीण भागातील अनेक आमदारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना खिळखिळी झाली. ज्या ठाकरेंनी फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखले, त्याच ठाकरेंच्या विरोधात स्वत:चाच पक्ष उभा करून फडणवीसांनी हिशेब चुकता केला.

२) काँग्रेस-राष्ट्रवादीकडून
सत्तेचा ऑक्सिजन काढून घेतला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्थापनेपासून अनेक वर्ष सत्तेत राहिलेले पक्ष आहेत. २०१४ ला राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या दोन्ही पक्षांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाणे अवघड गेले होते. त्यातच २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येईपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सत्तेत येणे शक्य होणार नसल्याचे २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट झाले होते. मात्र निकालानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याची ऐतिहासिक घटना घडली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा सत्तेचा ऑक्सिजन मिळाला. आता सरकार कोसळल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागणार आहे.

३) मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज
शिवसेनेतीलच आमदारांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्रिपद गमवावे लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी राज्यात सहानुभूती निर्माण होत होती, तर दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी ही खेळी खेळल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आम्हाला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
४) मुख्यमंत्रिपद नसले तरी
सत्तेची ताकद मिळणारच
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असले तरी विधानसभेत १०६ जागा असणा-या भाजपला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळणार, हे स्पष्टच आहे. अर्थमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदाचा मोह टाळला असला तरी इतर महत्त्वाची खाती असल्याने राज्याच्या सत्तेची चांगलीच ताकद भाजपला मिळणार आहे. एकीकडे केंद्राची पूर्ण बहुमताची सत्ता पक्षाकडे असताना त्याला आता राज्यातील सत्तेचीही जोड मिळणार आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणखी बळकट करण्यास आणि कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या