कांद्याच्या दरात घसरण, बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतक-यांना बसत आहे
कांद्याला हजारो रुपयांचा खर्च करून हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतक-याने कांद्याला दर नसल्याने, आपले एक एकरमधील कांद्याचे पीक मेंढरांसमोर टाकले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. एकरी हजारो रुपयांचा खर्च करूनही क्विंटलमागे शेतक-यांना फक्त ६०० ते ७०० रुपयांचा दर मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दर उतरल्याने कांद्याची विक्री करण्याऐवजी तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक एकरमधील ६० क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढरांसमोर टाकला आहे. सध्या मिळत असलेल्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांनी मेंढरांसमोर कांदा टाकला आहे.
कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे.