25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयबढतीमधील आरक्षणासाठी केंद्राने उचलली पावले

बढतीमधील आरक्षणासाठी केंद्राने उचलली पावले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बढतीमधले आरक्षण लागू होणार की नाही याची चर्चा सुरु असताना अखेर केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. हे आरक्षण लागू करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने जरी याबाबतचा अंतिम निकाल अजून दिला नसला तरी कोर्टानेच सांगितलेल्या अपेक्षित बाबींची पूर्तता करत हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व मंत्रालयांना याबाबतची आकडेवारी गोळा करुन त्यानुसार अंमलबजावणीचे आदेश केंद्राच्या डीओपीटी खात्याने दिले आहेत.

त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून रखडलेली भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय सेवेत मध्यम ते वरिष्ठ पदावर काम करणा-या एससी, एसटी वर्गातल्या अधिका-यांना याचा लाभ मिळणार आहे. वरिष्ठ पदावरच्या सहा हजार पदांपैकी जवळपास १८०० पदे रिक्त आहेत. यात अगदी जॉईंट सेक्रेटरीपासून ते सचिव पदांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी सेंट्रल सेक्रेटरियट सर्व्हिसेसच्या अधिका-यांनी भरती रखडल्याने एक निषेध आंदोलनही केले होते. सुप्रीम कोर्टाने यावर्षी २८ जानेवारीला याबाबत एक महत्त्वाचा आदेश दिला होता.

बढतीमधल्या आरक्षणासाठी निकष आम्ही ठरवणार नाही. पण याबाबत केडर हा घटक मानून कार्यवाही करण्यात यावी. त्यासंबंधीचा अनुशेष अस्तित्त्वात असल्याची आकडेवारी सरकारने गोळा करावी असे म्हटले होते. त्यानंतर केंद्र सरकारने नुकतंच सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. जर हे आरक्षण लागू केले नाही तर कर्मचा-यांमध्ये असंतोषाची स्थिती निर्माण होईल, बढती मागे घ्यावी लागली तर त्यातून अनेक पेचही निर्माण होतील, असे म्हणत कोर्टाला विनंती केली होती.

देशात २८ लाख लाभार्थी केंद्रीय कर्मचारी
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता एससी, एसटी वर्गातल्या अधिका-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार देशात जवळपास २८ लाख केंद्रीय कर्मचारी आहेत. त्यापैकी एससी समाजाचे साधारण पावणेपाच लाख, एसटी समाजाचे साधारण अडीच लाख केंद्रीय कर्मचारी आहेत. अनेक वरिष्ठ पदांवर या समाजाला न्याय मिळत नसल्याचीही आकडेवारी समोर येत होती. सुप्रीम कोर्टात याबाबत अंतिम निकाल अजून बाकी आहे. पण तोपर्यंत या बढतीमधल्या आरक्षणाची अंमलबजावणी किती वेगाने होते हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या