नवी दिल्ली : आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी मंगळवार दि. २९ मार्च रोजी हा वाद मिटविण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमावाद सोडविण्यासाठी दिशा दिली. आज पहिल्या टप्प्यातील ठराव पूर्ण झाला आहे. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, असे मेघालयचे मुख्यमंत्री संगमा म्हणाले. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते.
ऐतिहासिक दिवस : अमित शाह
आज आसाम आणि मेघालय यांच्यातील ५० वर्षांचा प्रलंबित सीमा विवाद सोडवण्यात आला आहे. विवादाच्या १२ पैकी ६ मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे, ज्यात सीमेच्या जवळपास ७० टक्के भागांचा समावेश आहे. उर्वरित ६ मुद्दे लवकरात लवकर सोडवले जातील. आज आंतरराज्यीय सीमा समझोत्यावर स्वाक्षरी करणे हा ईशान्येसाठी ऐतिहासिक दिवस आहे, असे अमित शाह म्हणाले.
१९७२ पासून जमिनीचा वाद
१९७२ मध्ये आसाममधून मेघालय वेगळे झाल्यानंतर जमिनीचा वाद उफाळून आला होता. नवीन राज्याच्या निर्मितीसाठी सुरुवातीच्या करारामध्ये सीमा समस्या उद्भवल्या. हाच वाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ जानेवारीला केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तपासणी आणि विचार करण्यासाठी एक मसुदा पाठवला होता. त्यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर आज निर्णय घेऊन करारावर स्वाक्षरी करण्यात आली.