29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयओमिक्रॉन व्हेरिएंटवर बायोएनटेक आणणार लस!

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर बायोएनटेक आणणार लस!

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : जगभराची चिंता वाढवणा-या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी लस शोधण्याचे काम बायोएनटेक कंपनीने सुरू केले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढल्यास पुढील १०० दिवसांत लस बाजारात आणण्याची तयारी बायोएनटेकने दर्शवली आहे. बायोएनटेक ही अमेरिकेत फायझरसोबत मिळून कोविड लस विकसित करणारी कंपनी आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत असल्याचे लक्षात येताच कंपनीने त्यावर काम करणे सुरू केले असल्याचे बायोएनटेककडून सांगण्यात आले. ओमिक्रॉन (बी.१.१.५२९) जगभरात पसरण्याची शक्यता गृहीत धरुन लसीमध्ये आवश्यक ते बदल करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. बायोएनटेकची सध्याची लस ओमिक्रॉनवर किती प्रभावी ठरते, हे निरीक्षणानंतर येत्या दोन आठवड्यात कळेल आणि त्या निष्कर्षावर आधारीत आवश्यक ते बदल लसीत केले जातील. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढलाच तर जास्तीत जास्त १०० दिवसांच्या आत यावरची नवी लस बाजारात आणण्याची तयारी असल्याचे बायोएनटेकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

फायझर आणि बायोएनटेक कंपनीने आम्हाला आशा आहे की, आम्ही ओमिक्रॉन व्हेरिएंटवर १०० दिवसांत प्रभावी लस संशोधन आणि उत्पादन करण्यात सक्षम आहोत, असे म्हटले. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपासून खूप वेगळा आहे. कंपनीने महिनाभर आधीच ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस बनवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले आहे. कोविड लस बनवणारी दुसरी मोठी कंपनी मॉडर्नानेदेखील काल २०२२ च्या सुरुवातीपर्यंत ओमिक्रॉनवरील त्यांचीही लस उपलब्ध होईल, असे म्हटले. त्यामुळे या घातक व्हेरिएंटला रोखण्यासाठी लस उत्पादक कंपन्या कामाला लागल्याचे चित्र आहे.

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनही प्रभावी
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस नव्या ओमिक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी प्रभावी ठरतील का, याचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्येला देण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असून त्याचा फायदा ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी होईल, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना नव्या व्हेरिएंटपासून असणारा धोका कमी असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

दोन्ही लसी घेतलेल्यांना फारसा धोका नाही
नवा व्हेरिएंट हा लसीकरण झालेल्यांच्या शरीरात प्रवेश करू शकेल, मात्र त्याचा प्रभाव फारसा जाणवणार नसल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाचा नवा व्हेरिएंट अस्वस्थ करू शकेल. मात्र, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे किंवा मृत्यू होणे यासारख्या संकटांपासून दिलासा मिळण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग असेल, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच लसीकरण झालेल्या व्यक्तींना नव्या व्हेरिएंटमुळे किरकोळ त्रास जाणवू शकेल, मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गरीब देशांना फक्त ०.६ टक्के लसी मिळाल्या
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस गेब्रेयसस यांनी करोना नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या लसीकरणावरून जी-२० देशांना चांगलेच सुनावले आहे. जगातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक कोरोनाविरोधी लसी जी-२० देशांकडे गेल्या आहेत. केवळ ०.६ टक्के लसी गरीब देशांना मिळाल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणताही एकटा देश लसीकरण करून कोरोना साथीरोगातून मार्ग काढू शकत नाही, असा सूचक इशाराही दिला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या