लंडन : चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (९ जुलै) कझाकिस्तानची एलेना रिबाकिना आणि ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर यांच्यात महिला एकेरीची लढत झाली. या लढतीत एलेना रिबाकिनाच्या रुपात विम्बल्डनला नवीन विजेती मिळाली. २३ वर्षीय एलेना रिबाकिना पेट्रा क्विटोवानंतर विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिने ओन्स जेबुरचा ३-६, ६-२, ६-२ असा पराभव करून विम्बल्डनचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
पहिला सेट जिंकल्यानंतर जेबुरलानंतर चांगला खेळ करता आला नाही. नंतरच्या दोन्ही सेटमध्ये ती रिबाकिनाच्या आव्हानाचा सामना करू शकली नाही. ट्युनिशियाची २७ वर्षीय जेबुर ही विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहचणारी, अरब आणि आफ्रिकन देशांतील पहिली महिला ठरली होती. २३ वर्षीय रिबाकिनाने २०१९ मध्ये वुहानमध्ये झालेल्या स्पर्धेत जेबुरचा पराभव केला होता, तर गेल्या वर्षी जेबुरने रिबाकिनाला पराभूत करून हिशोब बरोबर केला होता.
सामन्याच्या तिस-या गेममध्ये रिबाकिनाची सर्व्हिस तोडून जुबेरने जोरदार सुरुवात केली. तिने सुरुवातीच्या दमदार कामगिरीचा सदुपयोग करत पहिला सेट ६-३ असा जिंकला. पहिल्या गेममध्ये ब्रेक घेत दुस-या सेटमध्ये दमदार सुरुवात करून रिबाकिनाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत जोरदार पुनरागमन केले. कझाकच्या स्टारने दुस-या सेटमध्ये पुन्हा एकदा जेबुरची सर्व्हिस मोडून सामन्यात बरोबरी साधली आणि शिखर सामना निर्णायक तिस-या सेटमध्ये नेला.
तिस-या सेटमध्ये दुस-याप्रमाणेच सुरुवात करत २३ वर्षीय खेळाडूने पुन्हा एकदा तिच्या प्रतिस्पर्ध्यांची दोनदा सर्व्हिस मोडून सेट ६-२ असा जिंकला आणि तिच्या पहिल्या ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पराभूत होऊनही जेबुरने इतिहास रचला आणि रिबाकिना ग्रँडस्लॅमच्या शिखर लढतीत पोहोचणारी पहिली अरब आणि आफ्रिकन महिला बनली.