26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचा पुनश्च स्वबळाचा नारा

काँग्रेसचा पुनश्च स्वबळाचा नारा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये घटकपक्ष म्हणून सत्ता उपभोगणा-या काँग्रेसने अखेर महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये होणा-या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढवणार आहे.

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना दिले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणा-या महापालिका निवडणुका रंगतदार होणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या कित्येक दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी ठाम होते. त्यांनी वारंवार घटक पक्षातील सहका-यांना कोंडीत पकडले होते. टीकाही केली होती. आता त्यांनी आक्रमक होत थेट आदेशच दिल्याने सारे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काळात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका आहेत.

स्वबळ आजमावल्यास इथले चित्र वेगळेच असेल, हे नक्की. महाआघाडीतील घटक पक्ष असणा-या काँग्रेसने पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काय करणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये आघाडी होणार का याचीही चर्चा रंगत आहे. मात्र, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत झालेला प्रकार पाहता शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे ही शक्यता कमी वाटते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हे पाहता आगामी निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये युती होण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र, त्याासाठीही भाजप राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांप्रती असलेली भूमिका कशी असेल, यावर निर्णय घेऊ शकते.

२१ डिसेंबरला मतदान
धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशीदेखील माहिती मदान यांनी दिली. या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात राहील, असे आयुक्त मदान यांनी सांगितले आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?
पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारली जातील. ५ डिसेंबर २०२१ रोजी शासकीय सुटीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. निवडणूक लढविणा-या उमेदवारांना १० डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी होईल, अशी माहिती आयुक्त मदान यांनी दिली.

ग्रामपंचायत पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या ७ हजार १३० ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली होती. या सर्व जागांसाठी २१ डिसेंबरलाच मतदान होणार आहे. तर त्याची मतमोजणीही २२ डिसेंबरला होणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या