22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : कुठे आहे यूपीए? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच हा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या सवालावर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंट आणि घोड्यासारखी नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हीडीओ ट्विट करून ममतादीदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी हा टोला लगावला आहे. सोबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा व्हीडीओही अपलोड केला आहे. त्यात विलासराव काँग्रेसचे वर्णन करताना दिसत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यसारखी अडीच घरंही जात नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असेही चव्हाण यांनी नमूद केले आहे.

काँग्रेस सक्षम पर्याय : थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहीत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही : पटोले
आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ममता बॅनर्जी या यूपीएमध्ये नाहीत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अहंकार व्यक्तीला हरवतो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर थेट ममता यांना उत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या ममता ?
देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या