22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला मलिक यांच्या सल्ल्याची गरज नाही

काँग्रेसला मलिक यांच्या सल्ल्याची गरज नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसीय मुंबई दौ-यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, यानंतर आता महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते एकीकडे उत्तरे देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काँग्रेसला एक सल्ला दिला आहे. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले असून, नवाब मलिकांची तेवढी पात्रताच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहीत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

मलिकांची पात्रताच नाही
बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्वीकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, काँग्रेसला सल्ला द्यावा एवढी नवाब मलिकांची पात्रता नाही. काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच
ममता बॅनर्जी यूपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, यूपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावे लागणार आहे. देशात काँग्रेस पक्ष असून तो भाजपला विरोध करणारा आहे. पर्याय म्हणून काँग्रेस असून सर्वांचे सहकार्य घ्यावे लागेल हे खरे आहे. यूपीए सर्वांचे सहकार्य घेतच असते, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या