मुंबई : कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही! अशा शब्दांत जे. पी. नड्डांना शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून इशारा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी भविष्यात देशात एकही असा पक्ष उरायला नको, जो भाजपच्या विरुद्ध असेल. जेणेकरून इतर सर्व राजकीय पक्ष संपून जातील, फक्त भाजपा उरेल, असे वक्तव्य जे. पी. नड्डा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी तीव्र टीका केली. दरम्यान, शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून नड्डांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टक्के या हिशेबानेच बोलू लागले आहेत, असा टोला नड्डा यांना लगावण्यात आला आहे.
नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात.
भाजपचे वाढणारे बळ कृत्रिम आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही या सगळ्याला भीक न घालता प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे.
नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मराठीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही!