श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या महिन्याभरात अनेक काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या आहेत. आज दहशतवाद्यांनी एका हिंदू बँक व्यवस्थापकाची गोळ््या झाडून हत्या केली. या घटनेनंतर काश्मिरी पंडितांनी खो-यातून सामूहिक पलायन करण्याची घोषणा काश्मिरी पंडितांकडून करण्यात आली. त्यामुळे काश्मिरी पंडितांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल.
बँक व्यवस्थापक विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खो-यातील ज्या ज्या भागांमध्ये आंदोलने सुरू आहेत, त्या त्या ठिकाणची आंदोलने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. काश्मीरमधील अल्पसंख्याकांपुढे आता कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता आपल्याला पलायन करावे लागेल, असा निर्णय घेतला गेला आहे.
अमित शहा-डोवाल यांच्यात चर्चा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवारी (ता. २) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांबाबत चर्चा केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही या बैठकीला हजेरी लावली. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे गुरुवारी बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांनी गोळ््या झाडून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी शाखेत घुसून गोळीबार करून पळून गेल्याचे दिसत आहे. विजय कुमार यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.