22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रकिरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला

एकमत ऑनलाईन

सोमय्या किरकोळ जखमी, रात्री उशिरा बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना बाजूला करुन किरीट सोमय्यांची गाडी तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान एका शिवसैनिकाने गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले. त्यांच्या चेह-याला थोडीशी दुखापत झाली. पंचनामा होत नाही तोपर्यंत किरीट सोमय्यांनी गाडीतून खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. किरीट सोमय्यांनी या घटनेनंतर धक्का बसल्याचे म्हटले आहे. सोमय्यांनी या घटनेनंतर भाजप नेत्यांशी चर्चादेखील केली.

गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगडदेखील त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दाखवला. सोमय्या आता वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे.

पोलीस स्टेशनच्या आवारात शिवसैनिकांचे ७० ते ८० गुंड कसे पोहोचले आहेत. पोलिस आयुक्त जोपर्यंत इथं येऊन अधिका-यांना सस्पेंड करत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही. पोलिस अधिका-यांच्या उपस्थितीत शिवसैनिक हल्ला करतात. उद्धव ठाकरे यांच्या गुंडांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. पोलिस आयुक्त संजय पांडे उद्धव ठाकरे यांचे नोकर असल्यासारखे वागत आहेत, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला. दरम्यान, रात्री उशिरा सोमय्या बांद्रा पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी तेथे हल्ल्याविरोधात तक्रार दिली. त्यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते.यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले.

राज्यात अराजक निर्माण करण्याचा
प्रयत्न : पेडणेकर यांचे उत्तर
दोन दिवसांपासून असंतोषाचे वातावरण राणा दाम्पत्याने निर्माण केले. यापूर्वी त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्याकडे मदत मागितली. यामुळे हायव्होल्टेज ड्रामा भाजपच्या माध्यमातून राणा कंपनीकडून करण्यात आला, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. एवढे सगळं होऊनही किरीट सोमय्या साडेनऊ वाजता मी तिकडे पोहोचतोय असे सांगतात. शिवसैनिकांची माथी भडकवू नका, असे विनंतीपूर्वक सांगूनदेखील महाराष्ट्रात, मुंबईत अराजक पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतात, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या