नवी दिल्ली : देशात महागाई प्रचंड वाढली आहे. इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. आता सरकारकडून देखील महागाईचे प्रमाण जाहीर करण्यात आले असून मार्च महिन्यात हे प्रमाण सर्वांधिक असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महागाई दुप्पट झाले आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये वार्षिक महागाईचा दर ७.८९ टक्के होता. यंदा मार्च महिन्यात हेच प्रमाण दुप्पट झाले असून १४.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामागचे कारण देखील केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आला. त्यामुळे कच्चे तेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यादींच्या किमती वाढल्या आहेत. मार्च २०२२ मध्ये महागाईचा दर उच्च आहे असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा रशिया सर्वात मोठा देश आहे. पण, युद्धामुळे मध्यंतरी पुरवठा साखळी खंडीत झाली होती. तसेच पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. तसेच रशियाच्या कच्च्या तेलावर देखील बंदी घातली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, वायू यांच्या किमती वाढल्या आहेत. पण, आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही निवडणुकीच्या काळात भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या.
इंधनदर गगनाला भिडले
निवडणुका संपल्यानंतर तीन-चार दिवसांनी इंधनाच्या किमतीमध्ये हळूहळू वाढ होत गेली. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये तर प्रति लिटर डिझेलचा दर ९६.६७ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये आणि डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे.