नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात केवळ पद घेऊन मिरविणा-यांना कडक शब्दांत सुनावले असून, यापुढे जर जबाबदारी न निभावता पद घेऊन बसणार असाल, तर त्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असे म्हटले आहे. यापुढे तसे चित्र दिसल्यास केंद्रीय कार्यकारिणीपासून स्थानिक पातळीपर्यंत कार्यकारिणीत नव्या चेह-यांना संधी दिली जाईल, अशा शब्दांत पद घेऊन मिरविणा-या नेते, पदाधिका-यांना समज दिली आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिलीच बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. त्यावेळी खरगे बोलत होते. पक्षात संघटनात्मक जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत खरगे यांनी जबाबदारी न घेता बचावात्मक पवित्रा घेणा-या नेत्यांना कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखविला जाईल आणि त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी दिली जाईल, अशी घोषणा केली.
कॉंग्रेस महाअधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करणे आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या सकारात्मक प्रतिसादानंतर याचा लाभ कसा घेता येईल, यावर विचार विनिमय करण्यासाठी आज कॉंग्रेस कार्यकारिणीच बैठक बोलावली होती. यावेळी खरगे यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्य प्रभारींना ३० ते ९० दिवसांत जनतेशी संबंधित जनआंदोलन करणे आणि त्यासंबंधीचा रिपोर्ट सातत्याने देण्याचे आदेशही खरगे यांनी दिले.