नद्यांना पूर, सखल भाग पाण्याखाली
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज तुफान पावसाला सुरुवात झाली. चिपळूणमध्ये पावसाची धुवॉंधार बॅटिंग सुरू आहे. गेले तीन तास पडलेल्या पावसामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणी साचले. शहरातील सर्व अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, सतत कोसळत असलेल्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पात्रात वाढ होत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, या भागात एनडीआरएफचे पथकेही पाठविण्यात आली आहेत.
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. दरम्यान, कोकणात पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबईत मुसळधार
मुंबईतील कुर्ला-ठाणे आणि सीएसएमटी विभागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसातही मेन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर कॉरिडॉरवर लोकल वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
कोल्हापुरातही पूर
कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू असून, पंचगंगा नदीत पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.
अनेक भागांत प्रतीक्षाच
मराठवाड्यासह विदर्भ आणि इतर काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी पेरण्याही झाल्या. परंतु अद्याप दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.