नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर रोजच आरोग्याशी संबंधीत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. कोरोना संसर्गामुळे होणा-या त्रासासोबतच आता कोरोनामुक्त झाल्यानंतर अर्थातच पोस्ट कोविड आजारांबद्दल अनेक चिंताजनक बाबी समोर येत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर लहान मुलांमध्येही वेगवेळी लक्षणे दिसून आली आहेत. त्यानुसार काही मुले चव आणि वास घेण्याच्या क्षमतांमध्ये होणा-या बदलांमुळे आहाराशी संबंधीत अडचणी निर्माण होऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियामधील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.
पॅरासमिया या नावाने ओळखला जाणारा हा विकार कोरोनामुक्त झालेल्या प्रौढांमध्ये आढळून येत असल्याचे दिसत होते. मात्र आता हा विकार लहान मुलांनामध्येही दिसून येत आहे. या आजाराची लक्षणे ओळखण्यासाठी, यूईए आणि चॅरिटी फिफ्थ सेन्सने एक मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या विकारामुळे मुलांना ते खात असलेल्या अन्नातून कुजलेल्या मांसासारखा किंवा रसायनांसारखा घाणेरडा वास येऊ शकतो. हाच प्रकार अन्नाच्या चवीबद्दल सुद्धा होऊ शकतो. यूईएने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीमध्ये प्रोफेसर कार्ल फिलपॉट यांनी म्हटले की, पॅरासमियामुळे कमी कोणत्याही पदार्थाचा योग्य तो वास येत नाही. वासाच्या मिश्रणातील काही घटकांचाच वास घेण्याची क्षमता शिल्लक राहते आणि अन्नाचा वेगळाच वास येतो.
कोरोना एन्डेमिक होतोय
देशातील नाही, तर जगभरातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आता म्हणत आहे की, कोरोना हा आता एन्डेमिक होत आहे. याचे व्हेरियंट भविष्यात येतील. पण, त्याची संसर्ग करण्याची क्षमता कमी राहील. दरम्यान, अमेरीकेतील अंदाजे २५०,००० प्रौढ लोकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर पॅरासमिया झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत, विशेषत: गेल्या सप्टेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्गा झाल्यानंतर हे लक्षात आले की, त्याचा परिणाम मुलांवरही होत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.