परभणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर विभागातील ३८ अधिका-यांना राज्यकर सहायक आयुक्त पदावर बढती दिली आहे. यात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी गणेश पंडितराव बोराडे यांची राज्य कर सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती झाली.
त्यांना पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील महेश मनोहर अंतरकर (सध्या पुणे येथे कार्यरत) आणि इलियास अहमद मो.खान (सध्या औरंगाबाद येथे कार्यरत) यांनाही राज्य करसहाय्यक आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. गणेश बोराडे हे सेलू जवळील पाटोदा गावचे मूळ रहिवासी असून १९९६ ला कृषी पदवीधर झाल्यापासून ते परभणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.
१९९८ ला कृषी पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे गणेश बोराडे यांची राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली. त्यानंतर मुंबई, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी त्यांनी अधिकारी पदावर काम केले आहे. आता राज्य कर सहायक आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.