नवी दिल्ली : जगभरात झपाट्याने पसरणा-या कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे गुगलने १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे जागतिक स्तरावर धोका वाढला आहे.
अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल. गुगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते की नवीन वर्षात १० जानेवारीपासून आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करणार आहोत. त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल.
गुरुवारी गुगलच्या अधिका-यांनी कर्मचा-यांना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ऑफिस टू रिटर्न प्लॅन लागू केला जाणार नाही. पुढील परिस्थिती पाहूनच कार्यालयात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या आठवड्यात सुमारे ४० टक्के अमेरिकेतील कर्मचारी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कार्यालयात परतले आहेत. पण आता ओमिक्रॉनमुळे घरातून काम करण्यासारख्या गोष्टी पुन्हा सुरु कराव्या लागल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपल्या कर्मचा-यांना घरून काम करण्यास सांगणारी गुगल ही पहिली कंपनी होती. गुगलची जवळपास ६० देशांमध्ये ८५ कार्यालये आहेत.