पुणे : हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषविणा-या राशिद खानने तुफानी खेळी करीत गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध विजय मिळवून दिला. ३ बाद १६ या धावसंख्येवर असताना मैदानात आलेल्या डेव्हिड मिलरने नाबाद ९४ धावांची खेळी करीत गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. राशिद खानने १८ व्या षटकात ४४ धावांची गरज असताना एकाच षटकात २५ धावा कुटल्या. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर मिलरने लौकिकाला साजेसा खेळ करीत संघाला १ चेंडू आणि ३ गडी राखून विजय मिळवून दिला.
आजच्या सहाव्या सामन्यात त्यांनी पाचव्या विजयाची नोंद केली. या पाच विजयासह गुजरातच्या संघाने १० गुणांची कमाई करत अव्वल स्थान कायम राखले आहे. आतापर्यंतच्या या आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला १० गुणांची कमाई करता आली नाही. यावर्षीच्या आयपीएलमध्ये १० गुण पटकावणारा गुजरात हा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर हैदराबादच्या संघानेही आजच्या विजयासह कमाल करून दाखवली आहे. या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ हा सहा गुणांसह सातव्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्सवर दमदार विजय साकारला.
या विजयानंतर हैदराबादच्या संघाचे ८ गुण झाले आहेत. या ८ गुणांसह हैदराबादच्या संघाने सातवरून थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे हैदराबादच्या एका संघाने आजच्या विजयासह तीन संघांना धक्के दिले आहेत. हैदराबादच्या संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराबव पत्करावा लागला होता. त्यामुळे हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत तळाला म्हणजेच १० व्या स्थानावर गेला होता.