खंभात : गुजरातमधील खंभात इथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरविण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली असून, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या हिंसाचारातील आरोपींची मालमत्ताही बेकायदेशीर असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. ही मालमत्ता खरोखरच बेकायदेशीर असल्याचे आढळून आल्यास त्यावरही बुलडोझर चालविला जाणार आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही हिंसाचार आणि दगडफेक करणा-या आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर प्रशासनाने बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या आहेत.