पटियाला : बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची काही दिवसांपूर्वी फर्लोवर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. पॅरोल अथवा फर्लोवर सुटण्याच्या उद्देशाने तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह हा कट्टर कैद्यांच्या श्रेणीत मोड नसल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती राज मोहन सिंह यांच्या कोर्टाने पटियालाच्या एका रहिवाशाची याचिकाही निकाली काढली.
गुरमीत राम रहीम सिंह याला फेब्रुवारीमध्ये दिलेल्या फर्लोला आव्हान दिले गेले होते. न्यायालयाने गुरुवारी हा आदेश दिला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला ७ फेब्रुवारीला हरियाणा सरकारने कट्टर कैद्यांच्या श्रेणीत येत नसल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर, गुरुग्राममध्ये त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तीन आठवड्यांची रजा मंजूर करण्यात आली होती. फर्लो म्हणजे, तुरुंगातून दोषींची अल्पकालीन तात्पुरती सुटका असते.