लखनौ : उत्तर प्रदेशमधील आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यातच अमित शहा यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या कैराना शहरात घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधला. यावेळी अमित शहा यांच्यासह अनेकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर निवडणूक कठोर नियम लागू केले आहेत. कोणत्याही प्रकारची सभा, पदयात्रा, रॅली, कॉर्नर मिटींग घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र समोर आलेल्या फोटोमध्ये अमित शहा यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते विनामास्क दिसून येत आहेत. त्यामुळे आता अमित शहा यांच्याविरोधात निवडणूक आयोग कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाकडे सर्वांचे लक्ष
कोरोना नियमावलीचे पालन करूनच निवडणुका पार पडतील, असे आयोगाने सांगितले आहे. त्यानुसार रोडशो, पदयात्रा, सायकल रॅली काढण्यास मनाई आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचार रॅलीला मुभा नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.