मुंबई : विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना नोकरीच्या वेळी येणा-या अडचणी आणि इतर अडचणी लक्षात घेता गृहमंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवार दि. २९ मार्च रोजी कोरोना काळातील विद्यार्थ्यांसंबंधी गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाकाळात लोकांनी बाहेर पडून नये आणि कोरोना वाढू नये, यासाठी अनेक नियम लागू केले होते. जागोजात नाकाबंदी संचारबंदी लागू करण्यात आली होती. नाक्यानाक्यावर, चौका-चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येत होती. संचारबंदी आणि जमावबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस अनेकांना काठ्यांचा प्रसाद देताना, उठाबशा काढून घेताना दिसून आले. यात अनेक विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
संचारबंदी मोडल्याचे गुन्हे रद्द करणार
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांवर संचारबंदी मोडल्याचे गुन्हे हे मागे घेणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. कोरोना संक्रमण काळात संचारबंदीचे नियम मोडणा-या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वत: घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांना दिली. या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल. त्याद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावर विचार केला जाईल, जेणेकरून त्यांना भविष्यात वा परदेशी शिक्षणासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागू नये, हा आमचा प्रयत्न राहील, असे गृहमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा
परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना या गुन्ह्यामुळे विशेष अडचणी निर्माण होत होत्या. पासपोर्ट काढण्यापासून ते पोलीस व्हेरिफिकेशनपर्यंत सर्व बाबींची पूर्ताता या विद्यार्थ्यांना करावी लागते. अशा वेळी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर तसे नमून केले जाते. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले होते. ही निर्णय फक्त कोरोनाकाळात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत घेण्यात आलेला आहे. इतर प्रकरणातील गुन्ह्यांना हा निर्णय लागू होणार नाही, हे मात्र लक्षात घ्यावे लागणार आहे. मात्र कोरोनाकाळातील किरकोळ गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.