नवी दिल्ली : भारत माता की जय म्हणून दाखवा म्हणणा-या भाजपा आमदार राम कदम यांना काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारने स्टेजवरच ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान दिले आणि यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. न्यूज १८ च्या चौपाल या कार्यक्रमात सहभागी झालेले दोन्ही नेते मंचावर असतानाच चर्चेदरम्यान एकमेकांना आव्हान देऊ लागले. यावेळी कन्हैय्या कुमारने आव्हान पूर्ण केले, मात्र राम कदम शेवटपर्यंत गोडसे मुर्दाबाद बोलले नाहीत.
अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावरुन चिमटा काढत ट्वीट केले आहे. मंचावर असताना राम कदम यांनी कन्हैय्या कुमारला भारत माता की जय बोलता का?, एकदा बोलून दाखवा, असे आव्हान देत एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. तुम्ही १० फेब्रुवारी २०१६ मध्ये म्हटले होते की, माझ्या मुलाचे नाव भारत माता की जय ठेवेन, जेणेकरुन तो शाळेत गेल्यावर फी माफ करतील. यानंतर कन्हैय्या कुमारने राम कदम यांना थांबवत तुम्ही माझ्यामधला बिहारी जागा केला आहे, असे सांगत उत्तर देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत मी यांच्याशी आदराने बोलत होतो, आता यांनी माझ्यामधला बिहारी जागा केला आहे.
संबित पात्रा होण्याची हौस आहे का?
तुम्हाला संबित पात्रा होण्याची हौस आहे ना, त्यांनीही हा प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनाही उत्तर दिले होते. काय उत्तर दिले होते सांगतो.ह्याम्ही भारत माता की जय बोलतो. पण मग तुम्ही गांधींना मानत असाल तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा, असे आव्हानच कन्हैय्या कुमारने यावेळी दिले. यावर राम कदम यांनी आम्ही गोडसेच्या कार्याचे आम्ही कधी समर्थन केले आहे का? असा प्रश्न विचारला. यावर कन्हैय्या कुमारने उत्तर देत आरएसएसच्या कार्यालयात गोडसेचा फोटो लावला आहे, ग्वालियरमध्ये मंदिर उभारले आहे, असे सांगितले.