चापानेर : चापानेर (ता. कन्नड) कन्नड-वैजापूर राज्य महामार्गावर चापानेरपासून जवळच असलेल्या पावसे शेतवस्तीवर (गट क्र. २६६) येथे बुधवारी (ता. १३) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने शेतकरी कुटुंबास मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दीड ते दोन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कन्नड-वैजापूर महामार्गालगत चापानेर शिवारात (गट क्र.२६६) शेतवस्तीवर उमाकांत जयराम पावसे(३५) हे कुटुंबासह राहतात. बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाच जणांनी पावसे यांच्यावर लोखंडी रॉड व काठीने हल्ला केला. या उमाकांत व त्यांची भावजय तेजस्विनी हे गंभीर जखमी झाले. तसेच पत्नी सुनीता व दोन मुले यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत, कानातील सोन्याच्या रिंगा, पायातील जोडवे काढून घेतले आणि चाकूचा धाक दाखवून आवाज केला तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली होती.