शांघाई : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. भुकेने लोक व्याकूळ झाले असून पोट भरण्यासाठी टोकाचे पाऊल उचलत आहेत. चीनमधील शांघाईमध्ये एका व्यक्तीने जाणूनबुजून कोरोना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांकडे जात तो माणूस म्हणाला की मला अटक करा. तुरुंगात जेवण मिळेल या आशेने त्याने हे केले. चीनमधून मीडिया रिपोर्ट्स, व्हीडीओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा भयंकर घटना आता समोर येत आहेत. चीनमधील झिरो कोविड पॉलिसीमुळे परिस्थिती बिकट झाल्याचे म्हटले जात आहे.
चीनचे सर्वात मोठे शहर शांघाई कोरोनाच्या सर्वात वाईट प्रकोपाचा सामना करत आहे, साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून, चीनला संसर्गाच्या सर्वात प्राणघातक लाटेचा सामना करावा लागत आहे. कडक निर्बंधामुळे लोकांकडील खाण्यापिण्याच्या गोष्टी संपत आहे, त्यामुळे घरात कैद असलेल्या करोडो लोकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. वेगवेगळ्या अहवालांनुसार, स्थानिक लोकांना वैद्यकीय पुरवठ्यासह मूलभूत गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. शांघाईमध्ये बाजार बंद असल्याने महागाईही गगनाला भिडत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक व्हीडीओंमध्ये असा दावा केला जात आहे की शांघाईमधील लोक घराबाहेर पडून निषेध करत आहेत. लोक त्यांच्या खिडक्या आणि बाल्कनीत येऊन ओरडत आहेत आणि आपला राग व्यक्त करत आहेत. मदत, मदत, मदत, आमच्याकडे खायला काही नाही असे दुस-या एका व्हिडिओमध्ये लोक ओरडत आहेत.
रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली
शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाचीचिंता वाढली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनंिपग यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे लोक आता त्रस्त झाले आहेत. येथे लोकांकडे अन्नपदार्थ देखील शिल्लक राहिलेले नाहीत. वेगाने पसरणा-या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.