पाटणा : बिहारमधील रोहतास जिल्ह्यामध्ये एक अजब घटना घडली आहे, कालव्यावर बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल गायब झाला आहे. दहा फूट रुंद आणि साठ फूट लांबी असणारा हा पूल चोरांनी जेसीबीचा वापर करून चोरला. हा पूल अमियावर गावात असलेल्या आरा मुख्य कालव्यावर असलेल्या काँक्रीट पुलाच्या समांतर सुमारे पंचवीस फूट अंतरावर होता. जेसीबी मशिनच्या साहाय्याने पूल पाडून ट्रकमध्ये भरून तो पूल दुस-या ठिकाणी नेण्यात आला. गावक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोखंडी पूलाचे लोखंड चोर ट्रकमधून घेऊन गेले.
जेसीबीचा वापर करून हा पूल चोरांनी पाडला आणि त्याचे जवळपास वीस टन लोखंड त्या चोरांनी चोरले आहे. पूल चोरलेल्या व्यक्तीने तो पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगितले होते. रिपोर्टनुसार, पूल नसताना लोक बोटीचा वापर करून कालवा पार करत होते. पण १९६६ मध्ये एक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बोट कालव्याच्या खोल पाण्यात बुडाली. या घटनेमध्ये अनेक लोकांनी त्यांचा जीव गमावला. त्यानंतर कालव्यावरील लोखंडी पूल तत्कालीन सरकारने १९७२ ते १९७५ दरम्यान बांधला होता. काही काळाने या लोखंडी पूलाला समांतर काँक्रीट पूल बांधण्यात आला.