सहा महिन्यापूर्वीच आव्हान पूर्ण, मुख्यमंत्र्यांचे प्रत्त्युतर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या आव्हानावर जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले आहे. मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही, मला जे आव्हान स्वीकारायचे ते ६ महिन्यांपूर्वी पूर्ण केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. कोळी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मुंबईबाहेर गेलेल्या माणसाला मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही जण सकाळी उठतात, खोके गद्दार बोलतात. काही लोक मला आव्हान देत आहेत. पण मी छोटे-मोठे आव्हान स्वीकारत नाही, मला जे आव्हान स्वीकारायचे ते सहा महिन्यापूर्वी पूर्ण केले आहे. आव्हानाची जास्त इच्छा असेल तर त्यांनी मग महापालिकेच्या वॉर्डात उभे राहावे, असा टोलाही त्यांनी लगावला. मी जास्त बोलत नाही, मला काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही जेव्हा गुवाहटीला होतो तेव्हा वरळीतून जाऊन दाखवा, असे कोणी तरी म्हटले होते. हा एकनाथ शिंदे वरळीतून एकटा गेला. हेलिकॉप्टरने गेला नाही, असेही त्यांनी म्हटले. निवडणुका समोर ठेवून आम्ही काम करत नसल्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बीएमसी बजेट झाल्यानंतर काही लोक म्हणतात. नगरसेवक नाही मग कशाला निर्णय घेत आहेत. अरे नगरसेवक नाहीत तर लोकांना सेवा द्यायच्या नाही का? असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सर्व सामान्यांसाठी आहे. हवा प्रदूषण, आरोग्य, शिक्षण सगळ््या कामांसाठी निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी म्हटले. काँक्रीटच्या रस्त्यामुळे अनेकांची दुकान बंद होणार, लोकांना दिलासा मिळणार म्हणून तुमची पोटदुखी आहे का, असा प्रश्नही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला केला.
सभेला अल्प प्रतिसाद?
दरम्यान, वरळीतील सभेकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवली, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील सभेला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सभेसाठी असलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. लोकांच्या प्रतिसादाअभावी मैदान ओस पडले असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला असल्याचे त्यांनी म्हटले.