शिंदे सरकारचा दणका, ठाकरे सरकारने काढलेल्या निविदा रद्द
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका मागून एक धक्के दिले जात आहेत. शिंदे सरकारने उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक धक्का दिला आहे. जिल्हा नियोजन निधीच्या पाठोपाठ जलसंधारण विभागाची कामेही थांबवण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारने जलसंधारणाच्या ब-याच कामांना मंजुरी दिली होती. मात्र, या कामांना स्थगिती देण्यात आली असून, नव्याने काढलेल्या सर्व निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारने ४०३७ कामांच्या निविदा काढल्या होत्या. या सर्व निविदा रद्द होणार आहेत.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील निविदा प्रक्रियेच्या सर्व स्तरावरील सर्व कामांच्या निविदा रद्द करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने निविदा कार्यवाहीतील कोणत्याही कामांच्या निविदा अंतिम करण्यात येवू नयेत. तसेच निविदा अंतिम झालेल्या कोणत्याही कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येवू नयेत. रद्द करण्यात आलेल्या निविदांची (प्रकल्पनिहाय) तालुकानिहाय यादी सर्व संबंधित जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी परस्पर शासनास सादर करावी, अशा सूचना आज काढलेल्या परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने कालच महाविकास आघाडी सरकारला एक धक्का दिला होता. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये केलेल्या तीन बदल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली करण्यात आली होती, तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची बदली करण्यात आली होती. याबरोबरच औरंगाबादचे आयुक्त अस्तिककुमार पांडे यांची सिडकोमध्ये दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे-फडणवीस सरकारने रोखल्या आहेत.