जळगाव : शहरातील आदर्शनगर परिसरातील वेगळ्यावेगळ्या ठिकाणच्या तीन घटनांमध्ये तीन चारचाकी आणि सहा दुचाकी अज्ञात माथेफिरूंनी पेट्रोल टाकून पेटवून टाकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला. वाहनांना पेटविल्याच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षरश: पाच दुचाकी आगीत खाक होवून त्यांचा केवळ सांगाडा उरला होता. दरम्यान, काही माथेफिरू हे सीसीटीव्ही कॅमेल्यात कैद झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
आदर्श नगर परिसरात एसएसडी हाईट्समध्ये रहिवासी राजेश सावंतदास पंजाबी यांचे इमारतीचे काही बांधकाम अद्याप बाकी असून खाली सुरक्षारक्षक देखील परिवारासह राहतो. गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन माथेफिरू तरुणांनी एक साडी ३ दुचाकी आणि एक चारचाकीच्या बोनेटमध्ये अडकवली. नंतर पेट्रोल ओतून त्यांनी वाहनांना आग लावली. या आगीमध्ये दुचाकी क्रमांक एमएच १९. ४३९९, एमएच १९.४८९६ आणि एमएच १९.३७५६ या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. तसेच चारचाकी क्रमांक एमएच १९ सिव्ही ७१०६ चा देखील पुढील भाग व चाक जळून नुकसान झाले आहे.
दुचाकी जळत असताना अचानक जोरात आवाज झाला. त्यामुळे पंजाबी यांच्या घराच्या सुरक्षारक्षकाला जाग आली. त्याने लागलीच मालक राजेश पंजाबी यांना फोन केला आणि वाहने जळत असल्याची माहिती दिली. राजेश हे कुटूंबीयांसह खाली आले. पण आगीचे लोळ एवढे होते की पाय-यांच्या खाली उतरणे सुध्दा त्यांना कठीण झाले होते. अखेर शेजारच्यांच्या मदतीने वाहनांवर पाणी टाकून आग विझविण्यात आली.