रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथे आज सभा होणार आहे. या सभेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, खेडमधील उद्धव ठाकरे यांची सभा अतिविराट झाली.
त्यांच्या सभेला उत्तर द्यायचे म्हणून रामदास कदम यांच्या सांगण्यावरून शिंदे यांची सभा होत आहे. हा पोटरकटपणा आहे. जिथे जिथे सभा होणार तिथे उत्तर देणार. ठाकरे यांची सभा उत्स्फूर्त होती. शिंदे ठरवून लोक आणून सभा घेत आहेत. आमच्या सभेचा उच्चांक मोडण्यासाठी लोकांना आमिष दाखवणार असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या उच्चांकाचा आकडा मोडू शकत नाही. शिंदे यांच्या सभेला ५० टक्के सुद्धा उपस्थिती नसेल. रामदास कदम म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गून मास. कोकणात म्हण आहे, वेड्याच्या हातात दिली वात आणि वेडं नाचतं सारी रात. जर वेड्या माणसाच्या हातात काकडा दिलात तर तो आग लावत फिरणार. तशी अवस्था रामदास कदम यांची आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.