नवी दिल्ली : गीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक प्रफुल्ल कर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यात त्यांची प्राणज्योत मालविली आहे.
उडिया संगीत विश्वातील एक मोठे नाव म्हणून प्रफुल्ल कर यांचे नाव घेण्यात येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करून कर यांना आदरांजली वाहताना लिहिले आहे की, प्रफुल्ल कर यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला आहे. उडिया संगीतसृष्टीमध्ये प्रफुल्ल कर यांचे मोठे योगदान होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संगीतसृष्टीमध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्याने चाहत्यांची मोठी पसंती मिळविली होती. संगीताची जाण, त्यातून त्यांनी मांडलेला वेगळा विचार यातून त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेरणादायी राहिल. त्यांच्या परिवाराप्रती मी सहानुभूती व्यक्त करतो. असे मोदींनी म्हटले आहे.