कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोल्हापूर दौ-यावर आहेत. त्यांनी कोल्हापुरात पोहोचताच भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल केला. ‘डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नसून चोरमंडळ’असल्याचे ते म्हणाले.
गद्दार गेल्यानंतर संघटन मजबूत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज (दि. १) कोल्हापुरात शिवगर्जना मेळावा होत आहे. आज सायंकाळी पाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणा-या या मेळाव्याला खासदार संजय राऊत मार्गदर्शन करतील.
दरम्यान, कोल्हापुरात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. कायदा आणि पोलिस कोणाच्या मर्जीने नाचत आहेत? अशी विचारणा त्यांनी केली.
२०२४ ला सगळ्यांचा हिशेब देऊ, असा इशारा त्यांनी दिला. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
गायींच्या मृत्यूवरून हल्लाबोल
संजय राऊत यांनी कणेरी मठात झालेल्या गायींच्या मृत्यूवरून हल्लाबोल केला. अशा पद्धतीने गायींचे मृत्यू अन्य राज्यात झाले असते, तर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला असता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर दुस-या दिवशी गायींचा मृत्यू होतो. रेडाबळीप्रमाणे हा बळी आहे का? या प्रकरणाची चौकशी करावी, पण हे हत्याकांड असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोल्हापुरात शिवगर्जना मेळावा
दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर कोल्हापुरात होणा-या या पहिल्याच मेळाव्याला ‘शिवगर्जना’ असे नाव दिले आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग ठाकरे गटाकडून फुंकले जाणार आहे.